महेश्वर
महेश्वर विभाग आठरावा : बडोदें ते मूर महेश्वर– मध्यहिंस्थान, इंदूर संस्थान. नेमाड प्रांतांत नर्मदा नदीच्या काठीं हें गांव वसलेलें आहे. लोकसंख्या (१९०१) ७०४२. येथें पुष्कळ देवळें आहेत. येथील घाट व अहिल्याबाईचा राजवाडा हीं प्रेक्षणीय आहेत. महेश्वरास प्राचनी काळीं महिष्मती असें म्हणत असत. कारण येथें रेडे पुष्कळ होते व आहेत. रामायणांत व महाभारतांत याचा उल्लेख केलेला आढळतो. बौद्ध वाङ्मययांत हें नांव आढळतें. (राजवाडे-ज्ञानेश्वरी प्रस्तावना; रा. रा. भागवत-वि-विस्तार पृ. २२, पृ १००) या गांवी फार प्राचीन काळीं कार्तवीर्यार्जुन रहात होता अशी लोकांची समजुत आहे. कर्तवीर्यार्जुनाचे वंशज हैहय या नांवानें प्रसिद्ध होते. यांच्या ताब्यांत मध्यहिंदुस्थानाचा पूर्व भाग तीनशें वर्षें (९-१२ व्या शतकापर्यंत) होता. त्यावेळीं ही नगरी त्यांच्या राज्यांत होती. हैहयांचा चालुक्यवंशीय विनयादित्यांनीं पराभव केल्यावर हें गांव विनयादित्यांच्या ताब्यांत गेलें; पण त्यांनीं हैहयांनां तेथून हांकलून न देतां आपले मांडलिक म्हणून त्यांनां तसेंच राह...