रामपुर, संस्थान
विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रामपुर, संस्थान.- रोहिलखंडमधील एक संस्थान. हें संयुक्तप्रांत सरकारच्या वर्चस्वाखाली आहे. याच्या उत्तरेस नैनीताल जिल्हा; पूर्वेस बरेली; दक्षिणेस बुदौन; व पश्चिमेस मुरादाबाद आहे. येथील जमीन सपाट व सुपीक आहे. उत्तरेकडील भाग तरई दलदलीच्या जमिनीसारखा आहे. संस्थानांतून पुष्कळ लहान लहान नद्या वाहातात. या सर्व नद्या संस्थानच्या दक्षिण भागांतून वहात जाणारी रामगंगा नदी हिला जाऊन मिळतात. उत्तरेकडील भाग खेरीजकरून बाकीच्या भागांत जंगल मुळीच नाही. मधून मधून आंब्याची झाडें आहेत. उत्तरेकडील भागांत चित्ते आणि वाघ आढळतात. हें संस्थान शिकारी कुत्र्यांविषयीं फार प्रसिद्ध आहे. येथील हवामान बरेली, मुरादाबाद आणि नैनिताल जिल्ह्यांसारखेंच आहे. उत्तरेकडील हवा रोगट आहे.
इतिहास;-रोहिलखंडाचा इतिहास म्हणजेच या संस्थानचा पूर्वेतिहास होय. रोहिला अली महंमदानें अहमदशाह बादशहापासून रोहिलखंड हा प्रांत कायमचा मिळवून घेतला. अली महंमदाच्या मरणानंतर त्याची संपत्ति त्याच्या मुलांत वांटली गेली, तेव्हां रामपुर जहागीर त्याचा धाकटा मुलगा फैझुल्लाखान यास मिळाली. रोहिले व अयोध्येचे नबाब यांच्यांत वितुष्ट येऊन इंग्रजांच्या मदतीनें नबाबानें रोहिल्यांची कत्तल केली व रोहिलखंड आपल्या ताब्यांत आणिला. यावेळी फैझुल्लाखानला फक्त त्याची जहागीर ठेवून घेण्याला परवानगी दिली परंतु यानें नबाब वजीराला वाटेल त्यावेळेस मदत करावी असें ठरलें. नंतर कांही दिवसांनी फैझुल्लाखानानें सैन्याची मदत न घेतां त्याबद्दल १५ लक्ष रोख रुपये देण्याचें कबूल केले. सन १७९३ त फैझुल्लाखान मरण पावला. व त्याच्या कुटुंबांत तंटे सुरू झाले. वडील मुलास ठार मारून धाकटया मुलानें जहागिरी बळकाविली. अयोध्येच्या नबाबानें इंग्रजी सैन्याच्या मदतीनें धाकटया मुलास हांकून वडील मुलाचा मुलगा अहंमदअलीखान यास गादीवर बसविलें. स. १८०१ त रोहिलखंड इंग्रजसरकारकडे आले. रामपूरचा नवाब महंमद युसफअलीखान यानें १८५७ सालच्या बंडांत इंग्रजांस मदत केल्याबद्दल कांहीं जमिनी आणि पदव्या त्याला मिळाल्या. स. १८६४ त याचा मुलगा नबाब महंमद कब अलीखान हा गादीवर आला व ह्यास १५ तोफांची सलामी मिळत असे. याच्यानंतर स. १८८७ त मुषताक्अली आला परंतु हा दोनच वर्षे राहिला. नंतर हल्लीचा नबाब हामिदअलीखान बहाद्दुर हा गादीवर बसण्याच्या वेळेला अज्ञान होता. त्यामुळें स. १८९६ पर्यंत सर्व राज्यकारभार एक राजप्रतिनिधि मंडळ पहात असे आणि स. १८९६ नंतर नबाबाला राज्यकारभार करण्याचे अधिकार मिळाले. हे नबाब चांगले सुशिक्षित असून मुसुलमानांच्या शिक्षणाची काळजी वहातात.
संस्थानांत ११२० खेडी, ६ शहरें, आणि ५ तहशिली आहेत. संस्थानची राजधानी रामपूर शहर या ठिकाणी आहे. लोकसंख्या (१९२१) ४५३६०७. येथें शेंकडा ५५हिंदु आणि शें ४५मुसुलमान असून हे हिंदुस्थानी भाषा बोलतात. संस्थानच्या उत्तरेकडील भागांत इतर पिकें होतात. गहूं, तांदूळ आणि मका ही संस्थानांतील मुख्य पिकें आहेत. येथें सुती कापड विणण्याचा मुख्य धंदा आहे. याशिवाय नक्षीदार मातीची भांडी आणि पोलादी वस्तू तयार करतात. येथें साखर शुद्ध करण्याचे, कागदाचा रांधा करण्याचे आणि लाखेंचे रोंगण दिलेल्या वस्तू तयार करण्याचे लहान लहान कारखाने आहेत. संस्थानांतून साखर, तांदूळ आणि कातडी बाहेरगांवी जातात व बाहेरून धातू आणि मीठ संस्थानांत येतात. आग्नेयीपासून वायव्येकडे संस्थानमधून अयोध्या आणि रोहिलखंड आगगाडीचा मुख्य रस्ता जातो. येथें १९०२ साली कायदेमंडळ स्थापन झालें. ह्या मंडळावर एका अमलदाराची देखरेख असते. रामपूर शहरांत म्युनिसिपालिटी आहे. येथें एक अरबी विद्यालय असून त्यांत मध्यआशिया आणि हिंदुस्थानच्या निरनिराळ्या भागातून विद्यार्थी येतात. संस्थानांत १२ रूग्णालयें आणि दवाखाने आहेत.
शहर.- रामपूर संस्थानची राजधानी. हें अली महंमदचा धाकटा मुलगा फैझुल्लाखान याचें राहाण्याचें ठिकाण होतें. कांहीं काळ यास मुस्तफाबाद म्हणत असत. शहराच्या सभोंवताली ६ मैल घेराचें असें बांबूचें कुंपण आहे. शहराच्या मध्यभागीं एक विटांनी बांधलेला किल्ला आहे. ह्या किल्ल्याच्या आंत राजवाडे व इतर इमारती आहेत. किल्ल्यांत एक उत्तम संग्रहालय असून त्यांत हस्तलेख पुष्कळ आहेत. नबाबाकरिता खासबाग व खुश्रूबाग व राजवाडे बांधलेले आहेत. याशिवाय येथें एक तुरंग, शिपायांचें ठाणें, एक हायस्कूल व दवाखाने आहेत. १८९० सालीं ह्या ठिकाणीं म्युनिसिपालिटी स्थापन झाली. येंथें एक अरबी विद्यालय, विशिष्ट कलेची एक शाळा आणि पांच मुलींच्या शाळा आहेत.
(२) संयुक्तप्रांतांत साहाराणपूर जिल्ह्याच्या देवबंद तहशिलींतील शहर. येथें एक जैन लोकांचे देवालय व शेख इब्राहीम या मुसुलमान साधूचें थडगें आहे. ह्या ठिकाणी धान्याचा व्यापार मोठा आहे. हें शहर कांचेच्या बांगडयांकरितां फार प्रसिद्ध आहे.
(३) मुंबई इलाखा. महीकांठयांतील लहानसें संस्थान.
(४) मुंबई इलाखा, रेवाकांठयामधील लहानसें संस्थान.
(५) राजपुतान्यांतील टोंक संस्थानच्या जिल्ह्याचें व शहराचें जुनें नांव (अलीगड पहा.).
Comments
Post a Comment