मैहर - हें एक सनदी संस्थान मध्यहिंदुस्थानांत आहे.
मैहर - हें एक सनदी संस्थान मध्यहिंदुस्थानांत आहे. क्षेत्रफळ ४०७ चौरस मैल. यावर बाघेलखंडाच्या पोलिटिकल एजंटाची देखरेख असते. येथील संस्थानिक आलवारांतून येथें आले असावेत. हें संस्थान बेणिसिंग नामक रजपुतानें वसविलें. १८०६ व १८१४ सालांत ब्रिटिशसरकारनें या कुलांतील दुर्जनसिंग नामक पुरुषास सनदा दिल्या, त्यामुळें हें संस्थान त्याच्या ताब्यांत कायमचें राहिलें. १८६२ सालीं येथील संस्थानिकास राजा हा किताब व ९ तोफांच्या सलामीचा मान मिळाला. पुराणवस्तुसंशोधनशास्त्राच्या दृष्टीनें या संस्थानचें बरेंच महत्त्व आहे. लोकसंख्या (१९११) ७३१५५ असून यांत २०९ खेडीं आहेत. जमीन सुपीक आहे. संस्थानचे एकंदर वार्षिक उत्पन्न सुमारें दीड लाख आहे. मैहर गांव ही या संस्थानची राजधानी आहे. येथें सोळाव्या शतकांतील एक जुना किल्ला आहे.
Comments
Post a Comment